+91 81491 11915

विज्ञानातून वास्तुसंतोष

अध्यात्मातून विज्ञानाकडे

ISBN Number: 978-93-340-2897-3

VastuSantosh Book

॥ श्री गणेशाय नमः ॥

वास्तुशास्त्र परिचय व इतिहास

वास्तुशास्त्र म्हणजे आपण जेथे राहतो – व्यवसाय, नोकरी करतो, उद्योग धंदा करतो, त्या जागेवर दगड-विटांनी त्रिविध तापांपासून (ऊन, वारा, पाऊस) संरक्षणार्थ ज्या भिंती -छत बांधून त्यांचा उपभोग घेतो. थोडक्यात जेथे जेथे आपला वास (वास्तव्य) असतो. त्या-त्या ठिकाणांना ‘वास्तू’ असे म्हणतात.

‘शास्त्र’ म्हणजे त्यामागील विज्ञान, त्या वास्तूचा उपभोग घेण्याची पद्धत सांगणारे शास्त्र. दुसऱ्या भाषेत ‘निसर्गाशी सानिध्य व समतोल साधून देणारे शास्त्र, म्हणजे ‘वास्तुशास्त्र. ‘

वास्तुशास्त्रात आठ दिशा, नऊ ग्रह, बारा राशी, पंच महाभुते, पृथ्वीचे भ्रमण, पृथ्वीची विद्युत चुंबकीय शक्ती, गुरुत्वाकर्षण शक्ती, भौगोलीक परिस्थिती, वातावरण, या सर्वांचा सखोल अभ्यासातून ‘वास्तुशास्त्र’ तयार होते, ते कसे हे आपण प्रत्येक बाबींचा सखोल अभ्यासातून पुढे बघणारच आहोत.

मनोगत

प्रथम वंदन ‘श्री गेणशा, ‘कुलदेवी-देवता, “माता-पिता’, गुरू चरणी करून मी माझा अल्प परिचय व मनोगत मांडतो. मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून, माझे वडील, पौरोहित्य व ज्योतिष करत होते; आध्यात्माचा पारंपारिक वारसा होताच, बी. कॉम. पर्यंतचे शिक्षण घेऊन एल.एल.बी.चे शिक्षण अर्धवट राहिले व चरितार्थ चालवण्यासाठी अनेक नोकरी, व्यवसाय केले. कालांतराने मी ‘वास्तुशास्त्र’ या विषयाकडे वळलो. वास्तुदोषाचे परिणाम भोगले, अनुभवले, घरे, कुटुंब, गावे उद्ध्वस्त होताना पाहिले. बाजारातील वास्तुशास्त्राच्या नावे ‘वस्तू’ विक्रेते पाहिले, मग सामाजिक जाणीवेतून सखोल अभ्यासातून समाजोपयोगी काम व तेही माझ्या पारंपारिक क्षेत्रातून करायचे ठरवले. अभ्यासातून हे कळले की, प्रारब्ध ३३ टक्के, कर्म ३३ टक्के, प्रयत्न ३३ टक्के व भाग्य १ टक्के म्हणून मी सर्वांगिण ज्ञान प्राप्तीसाठी प्रख्यात ज्योतिष गुरू श्री. वसंत दामोदर भट सर यांच्या ‘पुणे ज्योतिष परिषद’ मध्ये विशारद व पंडित या ज्योतिष शास्त्रातील पदव्या घेतल्या. गुरूवर्य श्री. भट सर ही उपायांच्या नावाने कोणतीही ‘वस्तू’ विकत नाहीत, त्या विचारांनी मी अधिक प्रभावी झालो व तेच धोरण अवलंबले. मी वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्रातही कोणतीही ‘वस्तू’ विकत नाही.

समाजातील वास्तुशास्त्राचे खाली होणारी लोकांची फसवणूक कशी टाळता येईल व या लोकांच्या फसवणुकीने शास्त्राची होणारी बदनामी टाळण्यासाठी त्याच बरोबर लोकांना ‘पर्याय’ ही द्यायचा होता. तोही वैज्ञानिक दृष्टिकोणातून मी

अनेक धर्मग्रंथ व वास्तुशास्त्रांच्या ग्रंथांचा अभ्यास केला. ‘वस्तू’ विक्रेत्यांच्या ‘पद्धती’ जाणून घेण्यासाठी दोन-तीन ठिकाणी कोर्सही केले त्यातून माझे समाधान झाले नाही.

‘प्रदिर्घ अनुभव’ घेतला. व ‘परिपूर्ण माहिती’ या पुस्तकाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘विज्ञानातून वास्तुसंतोष’ हे पुस्तक वाचून प्रत्येकाला नक्कीच फायदा होईल. स्वतःचे व इतरांचेही वास्तुदोष निवारणासाठी मदत होईल. पर्यायाने लाखोंची फसवणूक होणार नाही.

या कामी गुरुतुल्य श्री. श्रीराम सबनीस सर, डॉक्टर्स, सिव्हिल इंजिनिअर, मॅकॅनिकल इंजिनिअर, मित्रांमध्ये श्री. सुधाकर आव्हाड, श्री. हिरालाल कौराणी यांचे मार्गदर्शन लाभले. मी त्या सर्वांचा आभारी आहे.

माझी पत्नी सौ. निर्मला हिचे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर विशेष सहकार्य लाभले. पुस्तक बांधणी व प्रकाशनपर्यंतचे सहकार्य श्री शंकर सर (दिलीप राज प्रकाशन), श्री. सिद्धारूढ नागुर व सौ. सुदर्शनाताई त्रिगुणाईत यांचे मोलाचे सहकार्य लाभले मी त्यांचा ऋणी राहिल.

आई-वडिलांचे संस्कार व शिकवणीतूनच हे शक्य झाले. (ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.) मातृ-पितृ देवो भव. ज्या आई-वडिलांमुळे मी घडलो त्यांच्या चरणी मी हे पुस्तक अर्पण करतो.

– पंडित श्री. संतोष वाल्मीक मिश्रा